पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा

गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर रद्द ठरविलेल्या पाचशे आणि हजार रूपयांच्या एकूण नोटांपैकी 99 टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने आज (बुधवार) आपल्या वार्षिक अहवालात जाहीर केले. रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) अंदाजानुसार, एकूण 15.28 लाख रूपये किंमतीच्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा 30 जून 2017 अखेर बँकांमध्ये परद आल्या आहेत. नोटाबंदीपूर्वी 15.40 लाख कोटी ते 15.50 लाख कोटी रूपये किंमतीच्या पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनात होता, असा अंदाज आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याची घोषणा केली होती. काळ्यापैशाविरुद्धच्या लढाईसाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले होते. नोटाबंदीनंतर जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी सरकारने नागरीकांना पन्नास दिवसांची मुदत दिली होती. 30 डिसेंबर 2016 रोजी ही मुदत संपली. त्यानंतर काही विशिष्ट समुदायांसाठी आणि अनिवासी भारतीयांसाठी ही मुदत वाढविण्यात आली. ती 30 जून 2017 रोजी संपली. 

राज्यसभेमध्ये दोन डिसेंबर रोजी अर्थ राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीपूर्वी पाचशे रूपयांच्या 1,716.5 कोटी नोटा आणि हजार रूपयांच्या 685.8 कोटी नोटा चलनात होता. ही रक्कम 15.44 लाख कोटी रूपये होते. 

'आरबीआय'मध्ये जुलै ते जून हे आर्थिक वर्ष असते. जूनपर्यंतच्या कामकाजाच्या वार्षिक अहवालामध्ये नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीचा तपशील बँकेने प्रसिद्ध केला आहे. 

वार्षिक अहवालातील काही महत्वाचे मुद्दे :

  • मार्च 2017 पर्यंत चलनातील नोटांचे प्रमाण 20.2 टक्क्यांनी घटले. चलनात 13.10 लाख कोटी रूपयांच्या नोटा मार्चअखेर होत्या.
  • चलनातील नोटांची संख्या 11.1 टक्क्यांनी वाढली. नोटाबंदीनंतर कमी रकमेच्या नोटांची बाजारात मागणी वाढल्यामुळे अधिक नोटा चलनात आल्या. 
  • पाचशे किंवा त्याहून अधिक रकमेच्या नोटांचे बाजारातील प्रमाण 73.4 टक्के आहे. ते प्रमाण नोटाबंदीपूर्वी 86.4 टक्के होते. 
  • नव्याने छापलेल्या दोन हजार रूपयांच्या नोटांचे एकूण चलनातील मार्चअखेरीसचे प्रमाण 50.2 टक्के आहे
  • मार्चअखेर दहा आणि शंभर रूपयांच्या नोटांचे व्यवहारातील एकूण प्रमाण 62 टक्के आहे. ते प्रमाण मार्च 2106 पर्यंत 53 टक्के होते. 
  • रिझर्व्ह बँकेचा खर्च दुप्पटीने वाढून 31,155 कोटी रूपये झाला. 2015-16 मध्ये हा खर्च 14,990 कोटी रूपये होता. नव्या नोटांची छपाई, वितरण हे खर्च वाढण्याचे प्रमुख कारण.
  • जुलै 2016 ते जुन 2017 या काळात नोटांच्या छपाईवर 7,965 कोटी रूपये खर्च झाले. आधीच्या वर्षात हा खर्च 3,420 कोटी रूपये होता.

संबंधित बातम्या