अल्झायमर्स - वृद्धत्वातील शाप 

डॉ. अविनाश भोंडवे
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

ऐंशी वर्षांचे एक आजोबा बाजारात एका खांबापाशी उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी हरवल्यासारखे भाव होते. खूप वेळ त्यांना तिथेच उभे पाहून एका हातगाडीवाल्याने त्यांना विचारले, 'आजोबा, काही हरवलेय का तुमचे?' आजोबांनी नकारार्थी मान हलवली. 'मग काही त्रास होतोय का तुम्हाला?' पुन्हा त्यांनी नकारार्थी मान हलली. 'मग तुम्हाला काही होतेय का?' 

क्षीण आवाजात आजोबा म्हणाले, 'मला आठवतच नाही, की मी कुठे आलो आहे? का आलो आहे?' 

ऐंशी वर्षांचे एक आजोबा बाजारात एका खांबापाशी उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी हरवल्यासारखे भाव होते. खूप वेळ त्यांना तिथेच उभे पाहून एका हातगाडीवाल्याने त्यांना विचारले, 'आजोबा, काही हरवलेय का तुमचे?' आजोबांनी नकारार्थी मान हलवली. 'मग काही त्रास होतोय का तुम्हाला?' पुन्हा त्यांनी नकारार्थी मान हलली. 'मग तुम्हाला काही होतेय का?' 

क्षीण आवाजात आजोबा म्हणाले, 'मला आठवतच नाही, की मी कुठे आलो आहे? का आलो आहे?' 

ऐंशी वर्षांच्या या आजोबांना 'अल्झायमर्स डिसीज' नावाचा आजार होता. एलॉइस अल्झायमर या जर्मन शास्त्रज्ञाने या आजाराची जगाला ओळख करून दिली. त्यामुळे त्याच्या नावाने ही व्याधी ओळखली जाते. जगभरात दरवर्षी 21 सप्टेंबरला 'जागतिक अल्झायमर्स दिवस' पाळला जातो. 

अल्झायमर्स हा आजार सुशिक्षितांनादेखील फक्त नावानेच माहिती आहे. या आजाराचे स्वरूप काय असते? त्याची लक्षणे काय असतात? आणि आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना जर हा आजार झाला तर काय करायचे? याची जाणीव मात्र फार कमी जणांना असते. त्यामुळे या आजाराबद्दल जनमानसात जागृती निर्माण करण्यासाठी या दिवशी जगभरात सर्वत्र कार्यक्रम केले जातात. आज भारतीयांची सरासरी आयुर्मर्यादा वाढत जाऊन सत्तरीच्या जवळपास पोचली आहे. यामुळे इ. स. 2015 पर्यंत अल्झायमर्सचे प्रमाण झपाट्याने वाढण्याचे अनुमान वर्तविले जात आहे. या दृष्टीने आज सर्वांनाच या आजाराची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. 

थोडेफार विस्मरण होणे ही वयोवृद्ध व्यक्तींमध्ये नेहमीचीच गोष्ट असते. मेंदूतील मज्जापेशींची वयोमानाप्रमाणे झीज होत गेल्याने हे घडते. यालाच वार्धक्‍यामधील स्मृतिभ्रंश (सेनाइल डिमेंशिया) म्हणतात. पण असा विसराळूपणा वयाच्या पासष्टीआधीसुद्धा होऊ लागतो. त्याला वार्धक्‍यपूर्व विस्मृती (प्रीसेनाइल डिमेंशिया) म्हणतात. 

वयोमानाप्रमाणे प्रत्येकच व्यक्तीची आकलनशक्ती आणि क्रियाशीलता हळूहळू कमकुवत आणि दुबळी होत जाते. मात्र काही व्यक्तीत सारासार बौद्धिक शक्ती, स्मरणशक्ती, भाववृत्ती, निर्णय-क्षमता इतकी कमी होते, की त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींची जाणीव (ओरिएंटेशन) आणि सभोवतालच्या गोष्टींची स्मृती (व्हीजन मेमरी) नष्ट व्हायला लागते. यालाच 'अल्झायमर्स डिसीज' म्हणतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रोनाल्ड रीगन, हॉलिवूडचा प्रसिद्ध नट चार्ल्स ब्रॉस्नन, मुष्टियोद्धा रे रॉबिन्सन आणि कित्येक भारतीय राजकीय नेते आणि महान कलाकार या आजाराने ग्रस्त होते. 

कुणाला होऊ शकतो? 
वृद्धत्व - वृद्धत्व हाच अल्झायमर्स आजार होण्यामागचा सर्वांत महत्त्वाचा 'रिस्क फॅक्‍टर' असतो. पण तरीही उतारवयातल्या प्रत्येकालाच अल्झायमर्स होतोच असेही नसते. वयाची साठी उलटलेल्या आणि सत्तरीपर्यंतच्या वृद्धांत हे प्रमाण 15 टक्के आहे. मात्र वयाची 85 वर्षे उलटलेल्या वृद्धांत अल्झायमर्सचे प्रमाण तब्बल 50 टक्‍क्‍यांपर्यंत आढळते. 

 • आनुवंशिकता : हा अल्झायमर्ससाठी आणखी एक महत्त्वाचा घटक ठरतो. 
 • जीवनशैलीचे आजार : उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कोलेस्टेरॉल वाढलेले असल्यास अल्झायमर्सची शक्‍यता वाढते. 
 • जनुकीय आजार : डाऊन्स सिंड्रोमच्या रुग्णांना चाळिशीनंतरच अल्झायमर्स होण्याची शक्‍यता असते. 
 • मेंदूला इजा : लहानपणी किंवा तरुण वयात डोक्‍याला मार लागलेला असल्यास उतारवयात अल्झायमर्स होण्याची शक्‍यता वाढते. 
 • लिंग : पुरुषांपेक्षा स्त्रियांना अल्झायमर्स होण्याची शक्‍यता जास्त असते. 
 • सामाजिक पार्श्‍वभूमी : उच्च शिक्षितांपेक्षा अशिक्षित किंवा अर्धशिक्षितांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. 
 • कारणमीमांसा : अल्झायमर्समध्ये मेंदूमध्ये आणि मज्जासंस्थेत काही विशेष बदल घडून येतात. मुख्य म्हणजे मेंदूतल्या पेशींची एकुणातली संख्या कमी होते. मेंदूचे कार्य चालू राहण्यासाठी मेंदूच्या विविध प्रकारच्या पेशी एकमेकांशी मज्जातंतूद्वारा संपर्क होणे आवश्‍यक असते. 

या आजारामध्ये या तंतूंमध्ये अमायलॉइड नावाचा तंतुमय प्रथिन प्रकार जमा होऊ लागतो. त्याचबरोबर न्यूरोफायब्रिल नावाचा दुसरा प्रथिन प्रकारदेखील वाढायला लागतो. या न्यूरोफायब्रिलमध्ये नळीच्या आकाराचे फॉस्फरस जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात असते. अमायलॉइड व न्यूरोफिब्रिल्स यांच्या गुंतागुंतीमुळे मज्जातंतूमधला एकमेकांचा संपर्क कमजोर व्हायला लागतो. याचा परिणाम म्हणून मेंदूच्या एका पेशीकडून दुसरीकडे संदेश पोचणे अशक्‍य व्हायला लागते. रुग्णाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होतो. 

मेंदूतील बौद्धिक कार्ये ही एका पेशीकडून दुसरीकडे न्यूरोकेमिकल्सद्वारे होणाऱ्या रासायनिक देवाणघेवाणीमुळे होते. ऍसिटिलकोलिन नावाच्या मेंदूमधील एका रसायनाची अल्झायमर्समध्ये कमतरता भासते. त्याचवेळी ग्लुटामेट नावाचे बुद्धी जागृत ठेवणारे दुसरे रसायन जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात वाढते. ग्लुटामेट या रसायनाचे प्रमाण जरुरीपेक्षा जास्त झाल्याने पेशी जरुरीपेक्षा जास्त उत्तेजित होऊन अखेर थकून जातात. यामुळे बुद्धीवर आणखी परिणाम होतो. 

लक्षणे 
अल्झायमर्स आजाराची लक्षणे सुरवात झाल्यापासून हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने वाढत जातात. 

 • सुरवात लहानसहान गोष्टी लक्षात न राहण्यापासून होते. त्यातच शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे काही मिनिटे किंवा तासापूर्वी घडलेली किंवा स्वत: केलेली गोष्ट लक्षात राहत नाही. उदा. खोलीतले दिवे किंवा बेसिनचा नळ बंद करण्यास विसरणे. नुकतेच घेतलेले औषध परत घेणे. 
 • कालांतराने या विस्मृतीत वाढ होऊन आपल्या घरचा पत्ता, स्वत:च्या जवळच्या किंवा ओळखीच्या माणसांची नावे विसरणे, म्हणजे दीर्घजीवी स्मृती नाहीशी होणे, स्वत:च्या निकटच्या आप्तांचीही नावे विसरणे अशासारख्या गोष्टी घडतात. बोलताना एकच प्रसंग पुन्हा पुन्हा सांगणे. 
 • सध्याच्या गोष्टीचा संदर्भ खूप जुन्या गोष्टींशी जोडला जातो. 
 • इतरांशी भेटणे-बोलणे कमी होते. 
 • दिशाबोध क्षमतेचा ऱ्हास होणे (डिसओरिएंटेशन) म्हणजे आपण आता कुठे आलो आहोत? कुठून आलो? आपल्या घरी जायचा रस्ता कुठला? यात गोंधळ उडतो. 
 • निर्णयक्षमता नष्ट होणे. 
 • व्यक्तिमत्त्व आमूलाग्र बदलून जाणे. 
 • व्यक्तीच्या सामाजिक वर्तनामध्ये अनिष्ट परिणाम होऊन कौटुंबिक नातेसंबंध विस्कटून जाणे. 

महत्त्वाची सूचक लक्षणे
आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीमध्ये विस्मृतीची लक्षणे दिसू लागली, म्हणजे त्यांना अल्झायमर्स झाला असे लगेच समजू नये. परंतु, खालील लक्षणे दिसली, तर मात्र सावध होऊन वैद्यकीय सल्ला आणि उपचार घ्यावेत. 

 • स्मरणशक्ती कमजोर होणे. 
 • दैनंदिन जीवनातील प्रातर्विधीसह इतर रोजची आवश्‍यक कार्ये, म्हणजे कपडे व्यवस्थित घालणे, खाताना स्वच्छता पाळणे इत्यादी गोष्टी अवघड जाणे. 
 • समोरचा काय बोलतोय ते लवकर न कळणे किंवा एखादा साधा शब्द त्यांना लवकर आठवत नाही, भाषेच्या आकलनात समस्या निर्माण होते. 
 • आत्ता दिवस आहे की रात्र? किती वाजले असावेत? या गोष्टी लक्षात येत नाहीत. तसेच आत्ता आपण घरी आहोत की दवाखान्यात? कुणाच्या घरी आहोत असे जागेविषयीचे भान त्यांना उरत नाही. 
 • त्यांचे विचार तसेच विचार करण्याची दिशा हरवते. 
 • रोजच्या वापरातल्या वैयक्तिक वस्तू त्यांच्या नेहमीच्या जागेवर ठेवण्यास ते नेहमी विसरू लागतात. 
 • साधा निर्णय न घेता येणे किंवा अंदाज बिघडणे. 
 • वागणे अतिशय लहरी होणे. 
 • व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल होणे. 
 • घरातील माणसांची नावे, साधे आकडे, आपला घराचा किंवा एखाद्या महत्त्वाच्या जागेचा पत्ता विसरणे. 

प्राथमिक काळजी 
येत्या काही वर्षात अल्झायमर्सचे रुग्ण समाजात मोठ्या प्रमाणात आणि अगदी घरोघरी आढळून येण्याची शक्‍यता असल्याने, या रुग्णांची प्राथमिक काळजी घेण्याबद्दल प्रत्येकाला माहिती हवी. 

 • आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीला अल्झायमर्स आहे, हे घरातील प्रत्येक लहानथोरांना माहिती हवे. एवढेच नव्हे, तर शेजारीपाजारी असलेल्यांनादेखील या सत्यतेची जाणीव हवी. वेळ पडल्यास यातील कुणालाही त्यांना मदत करता यायला हवी. 
 • अल्झायमर्सच्या रुग्णांना घराबाहेर कधी एकटे सोडू नये. 
 • एवढी दक्षता घेऊनही, ते एकटे न सांगता बाहेर जाण्याची शक्‍यता असल्याने त्यांच्या खिशात नेहमी त्यांचे नाव, संपर्कासाठी फोन नंबर, त्यांच्या घरचा पत्ता, लिहिलेला कागद किंवा एखादे छापील कार्ड ठेवावे. 
 • या व्यक्तींच्या सोयीसाठी घरात थांबा, पुढे जाऊ नका, दिव्याचे बटण, फोनची जागा असे फलक लावण्यासही हरकत नाही. 

निदान 
रुग्णाच्या तक्रारी, त्याच्या आजाराचा इतिहास याबाबत चर्चा केल्यावर रुग्णाची प्राथमिक तपासणी होते. 

त्यानंतर 'फोल्स्टिन मिनिमेंटल स्केल' अशासारख्या प्रश्‍नावलींचा उपयोग करून बुद्धी किती प्रमाणात कमी झाली आहे हे जाणून घेतले जाते. या प्रश्‍नावलीत रुग्णाच्या आजाराचे निदान आणि त्याचे गांभीर्य समजून घेण्यासाठी खालील प्रकारे प्रश्‍न विचारले जातात - 

 • काळाचे भान, वेळ, वार, महिना, कुठले वर्ष सुरू आहे? 
 • आता कुठे आला आहात? तुमचा पत्ता काय आहे? 
 • एखादी क्रिया रुग्णाला करायला सांगून त्याला ती कशी करायची ही समजते का पाहणे. 
 • रुग्णाला 3 शब्द सांगून, त्याची नोंद तो मनात ठेवून त्याला नंतर 10 मिनिटांनी पुन्हा आठवतात का हे पाहणे. 
 • साधी बेरीज-वजाबाकी करायला सांगून रुग्णाची हिशेब करण्याची आकड्यांविषयी क्षमता जोखली जाते. 
 • तपासणाऱ्या डॉक्‍टरांकडे रुग्णाचे व्यवस्थित लक्ष आहे हे सतत पाहिले जाते. 
 • नेहमीच्या वापरातल्या काही वस्तू दाखवून त्यांची नावे सांगायला लावणे. 
 • वाचन करता येते का? लिखाण करता येते का? हे जोखले जाते. 
 • आपण बोललेले तो परत बोलू शकतो का? याची नोंद घेतली जाते. 
 • चौकोन, पंचकोन काढायला सांगून रुग्णाची आकार समजण्याची क्षमता पहिली जाते. 

अशा प्रकारच्या तोंडी किंवा लेखी प्रश्‍नावलीतून रुग्णाचा स्मृतिभ्रंश कितपत आहे आणि तो किती तीव्र स्वरूपाचा आहे हे समजते. 

रुग्णाच्या रक्ताच्या विविध तपासण्या करून त्याला असलेल्या इतर आजारांची आणि ते नियंत्रित आहेत का याची तपासणी होते. 

मेंदूचा सी.टी. स्कॅन, एम.आर.आय. तसेच पेट स्कॅन करून मेंदूच्या पेशींवर होणारे परिणाम समजून घेतले जातात. अल्झायमर्सच्या रुग्णाच्या पेशी या निरोगी पेशींपेक्षा ग्लुकोज कमी प्रमाणात वापरतात. त्यामुळे त्या पेट स्कॅनमध्ये ओळखल्या जातात आणि अल्झायमर्सचे निदान केले जाते. 

उपचार 
हा आजार औषधांनी जरी पूर्ण बरा होऊ शकत नसला, तरी तो आटोक्‍यात ठेवता येतो. यामध्ये- 
1) औषधे - मेंदूमध्ये ऍसिटिलकोलीन हे रसायन वाढविणारी औषधे देणे. त्याचबरोबर ग्लुटामेट हे रसायन कमी करणारी औषधेदेखील उपयोगी पडतात. त्यासाठी डोनेपेझील, रिव्हास्टिग्मिन, टॅकरिन, गॅलॅन्टामाइन अशी औषधे वापरली जातात. 
2) कुटुंबीयांचे समुपदेशन - अल्झायमर्सच्या रुग्णाच्या कौटुंबिक सदस्यांची या आजाराला सामोरे जाण्यासाठी मनाची तयारी करणे, त्यांना आजाराविषयी आवश्‍यक ती सर्व माहिती देणे, रुग्णाच्या मर्यादा समजून घेण्याची त्यांची क्षमता वाढविणे. 
3) रुग्णाच्या मदतनीसाचे प्रशिक्षण - आजच्या जीवनात कुटुंबातील सर्व नोकरी-कामधंदे किंवा शाळा-कॉलेजमुळे दिवसभर बाहेर राहतात. यासाठी रुग्णाला मदत करण्यासाठी एखादी व्यक्ती नेमावी लागते. अशा व्यक्तीला रुग्णाला औषधे देणे, त्याच्या दैनंदिन कार्यांसाठी मदत करणे, रुग्णाच्या इतर गरजा आणि त्रास या गोष्टी शिकविणे गरजेचे असते. 
4) घराची पुनर्रचना - घरामधील व्यवस्था व आखणी बदलणे. उदा. रुग्ण वस्तू कुठे ठेवल्यात ते विसरतो, म्हणून त्याच्या कपाटांना पाट्या लावणे. 
5) सपोर्ट ग्रुप्स - भारतातल्या विविध शहरांत या आजाराच्या रुग्णांसाठी काही सपोर्ट ग्रुप्स चालविले जातात. आपल्या शहरातील मेंदूच्या तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून याची माहिती मिळू शकेल. एआरडीएसआय (अल्झायमर्स आणि तत्सम आजारांविषयी कार्य करणारी राष्ट्रीय पातळीवरील समिती), अल्झायमर्स ऑर्गनायझेशन, हेल्पएज इंडिया, डिग्निटी फौंडेशन अशा संस्था आणि अनेक मोठ्या रुग्णालयांद्वारेसुद्धा काही मदत गट भारतभरात कार्यरत आहेत. इंटरनेटच्या वापरातून असे गट शोधता येतील. 
अल्झायमर्सचे निदान योग्य वेळेत झाल्यास त्यावर जास्त चांगला उपचार करता येतो आणि रुग्णाच्या बुद्धीचा ऱ्हास रोखता येतो. तसेच त्याच्या नातेवाइकांना होणारा त्रास मर्यादित ठेवता येऊ शकतो. 

अल्झायमर्स टाळण्यासाठी 
1. शारीरिक व्यायाम - वयाच्या विशीपासून एरोबिक पद्धतीचा एखादा व्यायाम नियमितपणे करणे आवश्‍यक असते. यात चालणे, जॉगिंग, पळणे, पोहणे, सायकल चालवणे यापैकी कोणताही प्रकार करावा. पण किमान चाळिशी उलटल्यावर तरी आठवड्यातून किमान 5 दिवस 45 मिनिटे, सपाटीवर किंवा मैदानात भरभर चालण्याचा व्यायाम करावा. अल्झायमर्स टाळण्यासाठी हा व्यायाम वयाच्या साठीतदेखील सुरू करता येईल. 
2. आहार - प्रत्येकाने रोज संतुलित आहार घ्यावा. सकाळी न्याहारी, दुपारी आणि रात्री जेवण तसेच सायंकाळी काही मध्यम प्रमाणात खाणे असे दिवसातून चार वेळा थोडे थोडे खावे. आहारात ताज्या फळांचे आणि पालेभाज्यांचे प्रमाण अधिक असावे. 
3. मेंदूला चालना देणे - बुद्धिबळ खेळणे, उत्तम पुस्तकांचे वाचन करणे, शब्दकोडी सोडवणे, शास्त्रीय संगीत शिकणे यामुळे अल्झायमर्सचे प्रमाण कमी होते. 
4. निद्रा - रोज नियमितपणे किमान 6 ते 7 तास झोप घ्यावी. 
5. करमणूक - आयुष्यातला काही वेळ निखळ करमणुकीत घालवावा. मित्र-मैत्रिणींबरोबर, नातेवाइकांबरोबर अधूनमधून मोकळा वेळ घालवणे उपयुक्त असते. सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्य करणाऱ्या संस्थांशी संबंधित कार्य करणे आणि त्यानिमित्ताने विविध प्रकारच्या लोकांत मिसळणे आणि त्यांच्याशी सोशल इंटरॅक्‍शन करणे यामुळे अल्झायमर्स होण्याची शक्‍यता कमी होऊ शकते. 
6. आधीचे आजार - मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, वजन या गोष्टी कायमस्वरूपी नियंत्रणात ठेवाव्यात. 
मानवी मेंदू आणि त्याचे प्रत्येक छोटे-मोठे कार्य म्हणजे एक अद्‌भुत चमत्कार आहे. मेंदूबद्दल वैद्यकीय शास्त्राला जरी खूप ज्ञान असले, तरी मेंदूचे कार्य नेमके कसे चालते हे कित्येक वर्षांच्या अभ्यासानंतरही पूर्णपणे समजलेले नाही. जगभर सर्वत्र याबाबत संशोधन सुरू आहे आणि त्यातून येत्या काही वर्षांत या आजाराबाबत आणि त्याच्या उपचारांबाबत काही क्रांतिकारक शोध निश्‍चितपणे लागतील, अशी शास्त्रज्ञांना खात्री आहे. तसे झाले तर आजचे हे दुर्धर आजार सहजासहजी नियंत्रित करता येतील आणि मानवाचे जीवन अधिक सुखी होऊ शकेल.

संबंधित बातम्या