धाडसाची किंमत (संपादकीय)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौट हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांच्या 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमात तिला बोलावण्यात आले आणि 'हात दाखवून अवलक्षण...' अशी अवस्था करण जोहरची झाली. तेव्हापासून कंगनाचे नाव जे चर्चेत आहे, तो सिलसिला अजूनही सुरूच आहे... 

कंगनाची आणखी एक मुलाखत 'आप की अदालत' या कार्यक्रमात खटल्याच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली. त्यात ती आणखी दोन पावले पुढे गेली आणि कोणाचीही भीडभाड न ठेवता तिने आपली मते खूप धिटाईने मांडली. प्रसंगी ती भावुकही झाली. पण तिच्या मते जे सत्य आहे, ते मांडण्याचे, सांगण्याचे धाडस तिने दाखवले. 

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौट हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांच्या 'कॉफी विथ करन' या कार्यक्रमात तिला बोलावण्यात आले आणि 'हात दाखवून अवलक्षण...' अशी अवस्था करण जोहरची झाली. तेव्हापासून कंगनाचे नाव जे चर्चेत आहे, तो सिलसिला अजूनही सुरूच आहे... 

कंगनाची आणखी एक मुलाखत 'आप की अदालत' या कार्यक्रमात खटल्याच्या स्वरूपात प्रसिद्ध झाली. त्यात ती आणखी दोन पावले पुढे गेली आणि कोणाचीही भीडभाड न ठेवता तिने आपली मते खूप धिटाईने मांडली. प्रसंगी ती भावुकही झाली. पण तिच्या मते जे सत्य आहे, ते मांडण्याचे, सांगण्याचे धाडस तिने दाखवले. 

हे लेखन अर्थातच कंगना, तिची मते, ती खरी की खोटी.. याबद्दल फारसे नाहीच; तर त्यातून दिसणारा धीटपणा, धाडस याबद्दल आहे. अलीकडे सोशल मीडियामुळे खूप जण 'बोलके' झाले आहेत. एका दृष्टीने ते चांगलेही आहे. पण या बोलकेपणाचा हेतू केवळ तेवढाच दिसत नाही. त्याआडून आपले हिशेब चुकते करतानाच अधिक जण दिसतात. वास्तविक, खरे बोलणे याला फार हिंमत लागते. एकतर त्याचे परिणाम गृहीत धरावे लागतात, त्याला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागते, आपल्या खरेपणाचे पुरावेही द्यावे लागण्याची शक्‍यता असते.. या सगळ्यात शारीरिक पेक्षा मानसिक-भावनिक शक्तीच अधिक लागते. ती फार मोठी किंमत ठरू शकते. 

कंगना सध्या गाजते आहे, तिच्या दोन वक्तव्यांमुळे. एक म्हणजे - नेपोटिझम, अर्थात गटबाजी, घराणेशाही आणि दुसरे म्हणजे - हृतिक रोशन यांच्याबरोबरचे तिचे नातेसंबंध. पहिला विषय बोलणे धाडसाचे असले, तरी त्यात तिचे मन, तिच्या भावना तशा पणाला लागलेल्या नव्हत्या. दुसऱ्यात मात्र त्याच अधिक पणाला लागलेल्या दिसतात.. आणि त्यासाठी खरोखरच मोठी हिंमत लागते. कारण अनेकींना असे अनुभव येतात, पण या गोष्टींना सगळ्याच जणी तोंड देऊ शकत नाहीत. विविध कारणांमुळे त्या माघार घेतात किंवा तोंडच उघडत नाहीत. पण कंगनाने दोन्ही गोष्टी नाकारल्या म्हणून तिचे अधिक कौतुक! 

चित्रपटसृष्टीत गटबाजी आहे आणि 'स्टारकिड्‌स'च अधिक संधी मिळते, असे तिचे पहिले धाडसी विधान! ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे. पण यापूर्वी ती मांडण्याचे धाडस खूप कमी जणांनी, खरे तर फारसे कोणीच केलेले नाही. ते तिने केले, तेही जो माणूस खरोखरच स्टार किड्‌सनाच संधी देतो, अशा करण जोहरसमोर; तेही त्याचे नाव घेऊन! त्यावरून गदारोळ झाला. बहुतांश लोकांनी अर्थातच करण जोहरची बाजू घेतली; ते स्वाभाविकही होते. पण क्षीण आवाजात का होईन अनेक जण कंगनाच्या मताशी सहमत झाले. तसे होणेही खरे तर धाडसाचेच, याचे कारणही परत गटबाजीच! या लोकांना चित्रपटात काम करण्याची संधी त्यावर ठरणार असते. तरीही या मंडळींनी धाडस दाखवले. सोशल मीडियाचे काही फायदे आहेत, त्यापैकी हा एक! या मीडियामुळे चर्चा खूपच रंगली. विरोधातील मते उमटली तरी कंगनाला पाठिंबा देणारे संख्येने अधिक होते. त्यामुळे पूर्वी अशी प्रकरणे मुळात उठत नव्हती, उठलीच तर ती कधी दाबली जात तेही कळत नसे; तसे यावेळी झाले नाही. विषय इतका चर्चिला गेली, की कोणी काही विरुद्ध बोलले किंवा केले असते तर तीच व्यक्ती अडचणीत आली असती. एका जाहीर समारंभात करण जोहरने आपल्या कलाकारांना घेऊन तसा प्रयत्न करूनही बघितला, पण सगळेच व्यर्थ गेले. उलट त्यांनाच माफी मागावी लागली. 

रिलेशनशिप्स, अफेअर्स या गोष्टी अलीकडे तशा नवीन राहिलेल्या नाहीत. चित्रसृष्टीसाठी तर त्या अजिबातच नाहीत. त्यातलाच एक नातेसंबंध कंगना-हृतिक रोशनचा! तिने एका मुलाखतीत 'माय स्टुपिड एक्‍स' (म्हणजे माझा माजी मित्र वगैरे) असा उल्लेख कोणाचेही नाव न घेता केला. पण त्यावर हृतिकने प्रतिक्रिया दिलीच पण त्यांची व्यक्तिगत सगळी मेल्स उघड केली. तिनेही त्याला उत्तर दिले. हे प्रकरण अगदी पोलिस-कोर्टापर्यंत गेले. त्यावर ती 'आप की अदालत'मध्ये व्यक्त झाली. खूप सविस्तर बोलली. महत्त्वाचे म्हणजे, बोलण्याचे धाडस तिने दाखवले. या विषयावर बोलणे हीच मोठी गोष्ट असते ती तिने केली. आता तिच्यावर अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, प्रतिक्रिया देतात; पण नेपोटिझम असो वा नातेसंबंध; अजूनपर्यंत एकही जण तिचे एकही म्हणणे पूर्णपणे खोडून काढून शकलेला नाही. 

काही दिवसांपूर्वी राहुल गांधीही घराणेशाहीवर बोलले. अनेक गोष्टी त्यांनी त्यावेळी कबूल केल्या. पण हे सगळे भाषणच राजकीय होते. त्यात 'घराणेशाही' वगळता वैयक्तिक असे काही नव्हते किंवा समाजासमोर स्वतःला उघडे करणे असे नव्हते. जे या अभिनेत्रीने केले. तसे करावे की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकेल. पण कोणीतरी आपली बाजू मांडण्याचे धाडस दाखवते ही गोष्टही कमी महत्त्वाची नाही. 

अशा बाबतीत एक गोष्ट असते, जो बोलतो त्याची बाजू सहसा खरी मानली जाते. केवळ चित्रसृष्टीच नव्हे, कोणत्याही क्षेत्रात हे असे होते. अनेक जण वैयक्तिक आहे, कशाला बोला, म्हणून बोलणे टाळतात. पण त्यांचे मौन हे वेगळ्या अर्थाने घेतले जाते. ही व्यक्ती बोलत नाही, याचा अर्थ तिच्याकडेच काही खोट आहे, तीच चुकीची आहे, असे सर्रास मत आपण करून घेत असतो. दुसरी बाजू तपासण्याची-बघण्याची तसदीही कोणी घेत नाही. त्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही फरक पडत असेल - नसेल कल्पना नाही; पण तिच्या न बोलण्याने अनेक वर्षांनीही तिच्याबद्दलचे मत कायम राहते. त्यामुळेच प्रसंगाचे गांभीर्य बघून व्यक्त होणे, आपली बाजू मांडणे कधीही चांगलेच. कंगना रनौटच्या धाडसाचे यासाठी कौतुक करायला हवे. असे धाडस करायला, तेही एका बाईने, फार मोठी हिंमत लागते. त्याची किंमत द्यावीच लागते, पण त्याची पर्वा न करता, तिने ही हिंमत दाखवली. तिचे म्हणणे खरे-खोटे, योग्य-अयोग्य हे आणि त्यासाठी तिला किंमत मोजावी लागली का, हे कालांतराने कळेलच. 

संबंधित बातम्या