उकडीच्या मोदकांना डोंबिवलीकरांची पसंती

बुधवार, 13 सप्टेंबर 2017

डोंबिवली - गणेशोत्सवाच्या काळात नानाविध प्रकारचे मोदक बाजारात आले आहेत.

डोंबिवली - गणेशोत्सवाच्या काळात नानाविध प्रकारचे मोदक बाजारात आले आहेत. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, पिस्ता अशा अनेकविध प्रकारांतील मोदकांतूनही येथील गणेशभक्तांची पसंती उकडीच्या मोदकांस मिळत आहे. यंदा शहरात सुमारे 55 हजार उकडीचे मोदक खपतील, असा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. 

डोंबिवलीत 200च्या आसपास पोळीभाजी केंद्र असून, यातील काही केंद्रांत सध्या उकडीचे मोदक बनवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. विभक्त कुटुंब पद्धती तसेच नोकरीमुळे गणेशोत्सवाच्या काळात घरच्या होममिनिस्टरला वेळेचे नियोजन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यावर पर्याय म्हणून उकडीचे रेडीमेड मोदक खरेदी करण्याकडे कल वाढत चालला आहे. गणेशोत्सवाच्या आठवडाभरआधीच मोदकांची ऑर्डर दिली जाते. हे मोदक आंबेमोर किंवा बासमती तांदळाच्या पिठाची उकड घेऊन बनवले जातात. त्यात गुळखोबरे, साखर, ड्रायफ्रूटस्‌ आदींचे सारण भरले जाते, अशी माहिती त्रिमूर्ती पोळी-भाजी केंद्राचे मालक संजीव कानिटकर यांनी सांगितली. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत मोदकाच्या किमतीत प्रतिनगाप्रमाणे 5 रुपयांनी वाढ झाली असल्याचे कुलकर्णी ब्रदर्सचे श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या